राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळांत केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता, लुच्च्या लफंग्या-चोरट्या-ऐदी-हलकटांच्या चेनीसाठी कसा होत आहे, इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. दुष्काळाने कोट्यवधी लोक देशात अन्नान्न करून मेले, तरी देवळांतल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरभाताचा त्रिकाळ नेवेद्य अखंड चालूच आहे. हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरूण उदरभरणासाठी भया भया करीत फिरत असले, तरी अब्जावधी रूपयांचे जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळांतल्या दगडधोंड्यांचा शृंगारथाट बिनतक्रार दररोज चालूच आहे. देशातला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही. विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा, म्हणून ९६ जिवांचा सारखा कंठशोष चालू असतानाही, देवळाच्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट, गोसावडे, गंजड आणि टगे गंधभस्म ख्द्राक्षांच्या पुण्याईवर पोट फुटून वांती होईपर्यंत परार्धावरी पल्ले धान्याचा बिनबोभाट फडशा पाडीत असतात.