महात्मा जोतीराव फुले यांनी गुलामगिरी? हा ग्रंथ लिहिताना आपल्या प्रस्तावनेत म्हटले होते की... “या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे की, आज शेकडो वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दु:खे सोशीत आहेत व नाना प्रकारच्या यातनांत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टींकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तिजविषयी नीट विचार करणे व येथून पुढे भटब्राह्मण लोकांचे अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणे हाच काय तो आहे. या देशात इंग्रज सरकार आल्यामुळे शूद्रादि अतिशूद्र, भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठे दु:ख वाटते की, भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामात किती लुटून खातात, याकडे आमच्या सरकारचे मुळीच लक्ष पोहचले नाही, तर त्यांनी दयाळू होऊन या गोष्टीकडेच नीट रीतीने लक्ष पुरवावे व त्यांस भट लोकांच्या मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावे, अशी आम्ही आपल्या जगचन्नियंत्याजवळ शेवटची प्रार्थना करितो.”