मा.गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले शिवचरित्र १९०६ साली लिहिले. भारतावर त्यावेळी इंग्रजी राजवट होती. त्या पोलादी पकडीच्या काळात ऐतिहासिक संदर्भ, सत्याचा आधार घेऊन महाराजांच्या चरित्राची विवेकशील मांडणी करताना त्यांना किती कष्ट पडले असतील. एकतर साधनांची अपूर्णता, व परिस्थितीजन्य सहकार्याचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीशी लढून त्यांनी या ग्रंथाची तपशीलवार मांडणी केली. राष्ट्रउभारणीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचा हा निव्वळ एक चरित्रग्रंथ नसून गुरूवर्य केळूसकर गुरूजींनी सरल, व सोप्या भाषेत समग्र व सविस्तर अशी मांडणी करून लिहिलेले हे मराठीतील पहिलेच एकमेव उत्तम चरित्र आहे. भारतभूमीला यवनांच्या सत्तेपासून मुक्त करण्यासाठी बहुजन समाजातील सर्व जाती-धर्माच्या मदतीने, गनिमी कावा, मुत्सद्दीपणा व कल्पक प्रशासन या कौशल्यांच्या आधारे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले, व ते पूर्णत्वास नेण्यासाठी अथक प्रयत्न केले, त्याच युगपुरूषाचे केळूसकर गुरूजींनी विवेकशील मांडणी करून लिहिलेले हे प्रदीर्घ शिवचरित्र आहे. हे चरित्र सर्व आबालवृद्धांनी व तरूणांनी वाचावे यासाठी याच प्रदीर्घ चरित्राचे त्यांनी संक्षिप्त शिवचरित्रहि १९२७ मध्ये लिहिले. ते संक्षिप्त शिवचरित्र वसुधा प्रकाशन, नाशिकतर्फे आज पुर्नप्रकाशित होत आहे. आजच्या पिढीच्या प्रत्येक जागरूक तरूणाने हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.