भारतीय संस्कृती निर्दोष व्हावी, वाढत जावी, तेजाने फुलावी, असे मला उत्कटतेने वाटते. ही संस्कृती ज्ञानमय आहे. संग्राहक आहे, कर्ममय आहे. ही संस्कृती सर्वांना जवळ घेईल, नवीन नवीन प्रयोग करील, अविरत उद्योग करील. भारतीय संस्कृती म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांचा विकास. भारतीय संस्कृतीचा आत्मा स्पृश्यास्पृश्ये मानीत नाही. हिंदू मुसलमान जाणत नाही. प्रेमाने व विश्वासाने सर्वांना मिठी मारून, ज्ञानमय व भक्तिमय कर्माचा अखंड आधार घेऊन मांगल्य सागराकडे, खऱ्या मोक्षसिंधूकडे जाणारी ही संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीच्या उपासकांची महान यात्रा अनादी कालापासून सुरू आहे. व्यास, वाल्मिकी, बुद्ध, महावीर, शंकराचार्य, रामानुज, ज्ञानेश्वर, तुकाराम, नानक, कबीर वगैरे मोठमोठ्या संतांनी ही यात्रा चालविलेली आहे. आजही महात्मा गांधी, त्यागमूर्ती जवाहरलाल, महर्षी अरविंद वगैरे महान विभूती ती भव्य यात्रा पुढे नेत आहेत. चला, आपण लहान मोठे या यात्रेत सामील होऊ यारे, यारे, अवघे जन अशी हाक हे भारतीय संस्कृतीचे सत्पुन्न सर्वांना मारीत आहेत. ही हाक ज्याच्या हृदयाला पोचेल तो धन्य होय !